बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेला बुधवारी काळा दिवस ठरला.गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट अचानक उलटल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला,तर अनेक भाविक जखमी झाल्याने यात्रेच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे.या घटनेमुळे प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून भाविकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या दुर्घटनेत सिंदखेडराजा तालुक्यातील बिबी येथील रहिवासी सौ.प्रमिला शेषराव राठोड (वय ५५ वर्षे) आणि सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.दोघीही धार्मिक भावनेने अधिकमास यात्रेसाठी आल्या होत्या;मात्र देवदर्शनाच्या ओढीने आलेल्या या महिलांचा प्रवास मृत्यूमध्ये संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिक, पोलीस,महसूल प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.पाण्यात अडकलेल्या भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, तर जखमींना तातडीने माजलगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.काही जणांवर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली असल्याची माहिती मिळत आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेसाठी येतात.अशा वेळी नदीत बोटीद्वारे वाहतूक होत असताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन झाले का, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते का,जीवनरक्षक जॅकेटची व्यवस्था होती का आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेतली होती का,असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ही दुर्घटना केवळ अपघात म्हणून विसरून चालणार नाही, तर यामागील कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. धार्मिक यात्रांमध्ये लाखो भाविक सहभागी होत असताना सुरक्षिततेची जबाबदारी ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. निष्काळजीपणामुळे निरपराध भाविकांना जीव गमवावा लागत असेल,तर अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
दरम्यान,या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमी भाविकांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी,अशी प्रार्थना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.
न्यूज एक्सप्रेस १८ विशेष वृत्त.**
*वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत! ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एक्सप्रेस १८.*
