१. जुन्या वादातून आकुर्डीत टोळक्याचा जीवघेणा हल्ला; तीन वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत
आकुर्डी :
पूर्वी झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीच्या वादाचा राग मनात धरून टोळक्याने दोघांवर घातक शस्त्रांनी खुनी हल्ला केल्याची घटना आकुर्डीतील रेनबो गार्डनजवळ घडली. या हल्ल्यात मयूर सुनील पाटील व कुमार दशरथ कांबळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. टोळक्याने परिसरात दहशत माजवत टोयोटा फॉर्च्युनर, अशोक लेलँड टेम्पो आणि हुंडाई कारची तोडफोड केली.
या प्रकरणी विकास अंकुश भिसे (वय २८, रा. दळवी नगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित दीपक ओहाळ, आदित्य सुरेंद्र यादव, श्रेयश सदाशिव टाकळकर, निरंजन भीमराव काळभोर, चेतन रमेश काळभोर, रोहन फाजगे (सर्व रा. आकुर्डी) व इतर साथीदारांवर भारतीय न्याय संहिता, आर्म्स ॲक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
२. ‘तुमच्या क्लिनीकमधील पेशंट आमच्याकडे का पाठवत नाही?’ रहाटणीत डॉक्टर व परिचारिकेला मारहाण
रहाटणी :
‘तुमच्या क्लिनीकमध्ये आलेल्या रुग्णांना आमच्या मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी का पाठवत नाही,’ असा जाब विचारत शेजारील मेडिकल चालकाने कुटुंबीयांसह येऊन डॉक्टर आणि महिला परिचारिकेला शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार रहाटणीतील श्री महावीर क्लिनीकमध्ये घडला.
याप्रकरणी डॉ. संदीप वसंतलाल लुनावत (वय ५८, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून गुरुकृपा मेडिकलचा चालक ओंकार सुनील पाटील (वय २५, रा. पवना नगर, रहाटणी), त्याची आई संगीता पाटील, बहीण व इतर साथीदारांवर भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी क्लिनीकमधील सिस्टर लता कोलते आणि भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या मुलीलाही धक्काबुक्की व मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक माळेगावे पुढील तपास करत आहेत.
३. रिक्षा वळवण्यावरून वाद; पिंपळे निलखमध्ये रिक्षाचालकाचा पट्ट्याने गळा आवळून खुनाचा प्रयत्न, एक अटकेत
पिंपळे निलख :
रस्त्यावर थांबलेल्या तरुणांना ‘गाडी वळवायला अडचण होत आहे, बाजूला व्हा’ असे सांगणाऱ्या रिक्षाचालकावर लाकडी फळीने हल्ला करून, कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ६६ अव्हेन्यू सोसायटीजवळ घडली.
या हल्ल्यात नारायण बाबुराव करडे (वय ५०, रा. पंचशील नगर, पिंपळे निलख) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आकाश दिलीपसिंग ठाकूर (वय २८, रा. पिंपळे निलख) याला अटक केली असून अबु उर्फ अभिजीत मेश्राम, प्रदीप बोईने व अन्य एका अनोळखीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्कमवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.
४. वासुली-चाकण रस्त्यावर भरधाव बसची धडक; २३ वर्षीय दुचाकीस्वार ठार
म्हाळुंगे :
भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या टाटा कंपनीच्या बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वराळे गावच्या हद्दीत अव्हेन्यू कंपनीजवळ घडली.
तुषार युवराज वराडे (वय २३, रा. रोशनवन सोसायटी, वराळे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर श्रीराम वराडे (वय २३) यांनी उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक आकाश राजेंद्र भालशंकर (रा. वैराग, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५. वाकडमध्ये भरधाव फॉर्च्युनरची दुचाकीला धडक; दोन तरुणी जखमी, चालक पसार
वाकड :
मानकर चौक ते छत्रपती चौक रस्त्यावर जावा शोरूमसमोर पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारने (mh 14 ha 0010) समोर चाललेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणी रस्त्यावर पडून जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी चालक गाडीसह पसार झाला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संक्षिप्त गुन्हे वार्ता :
* भोसरीतून १२ लाखांची स्कॉर्पिओ चोरीला : इंद्रायणी नगर, भोसरी येथील प्रकाश निलम सोसायटीच्या खुल्या पार्किंगमधून अज्ञात चोराने दत्तात्रय दौंडकर यांची १२ लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (mh 14 nd 8909) चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
* कौटुंबिक वादातून इंदोरीत मारहाण : इंदोरी (ता. मावळ) येथे रात्री उशिरा घरी येण्यावरून झालेल्या वादातून जय जालिंधर टेमगिरे व गिरीश सुख्डकर यांनी गणेश ढोरे (वय ४०) यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
* सोयाबीन मशीन नेल्याच्या कारणावरून वृद्ध शेतकऱ्याला मारहाण : चऱ्होली बुद्रुक येथे शेतातून सोयाबीन गाळण्याची मशीन नेल्याचा संशय घेऊन सत्यवान पठारे याने शंकर गुलाब पठारे (वय ६३) या शेतकऱ्यास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. दिघी पोलीस तपास करत आहेत.
* जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे : दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी निघोंजे येथे महिंद्रा गेटसमोर तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले. तर, वाकड पोलिसांनी थेरगाव येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये रम्मी जुगार खेळणाऱ्या चार आचाऱ्यांना ताब्यात घेऊन ३,९०० रुपयांची रोकड व साहित्य जप्त केले
