Site Logo
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापौर रवि लांडगे यांचा पुढाकार*

नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व परिणामकारक करण्यावर भर*

पिंपरी, दि. २७ एप्रिल २०२६*: शहरातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा मिळण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांना सुलभ, पारदर्शक आणि सहकार्यपूर्ण प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून अधिक परिणामकारक प्रणाली उभारण्यासाठी महानगरपालिका सकारात्मक पावले उचलेल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांच्या प्रशासकीय व नोंदणीसंदर्भातील अडचणींवर चर्चा करण्यासाठी दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, माजी महापौर व नगरसदस्या डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेवक कुशाग्र कदम, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध डॉक्टर संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभागृह नेते प्रशांत शितोळे म्हणाले की, शहरातील नागरिकांना प्राथमिक स्तरावर तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या कामकाजातील प्रशासकीय अडचणी कमी करून नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक करणे गरजेचे आहे. डॉक्टर आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहील.

बैठकीदरम्यान डॉक्टरांनी नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, कागदपत्रांची पूर्तता, विविध विभागांशी समन्वय, प्रशासकीय विलंब तसेच तांत्रिक अडथळ्यांविषयी आपली मते मांडली. महापौर रवि लांडगे यांनी सर्व मुद्दे संयमाने ऐकून घेत प्रशासनास आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश दिले.

नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी, सुसंगत व पारदर्शक करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. डॉक्टरांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच सर्व प्रक्रिया सुलभ पद्धतीने पूर्ण व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलण्याबाबत चर्चा झाली.

शहरातील आरोग्य व्यवस्थेत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व क्लिनिक चालक डॉक्टरांचे योगदान महत्त्वपूर्ण असून नागरिकांना प्राथमिक स्तरावर त्वरित सेवा उपलब्ध करून देण्यात त्यांची भूमिका मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या कामकाजात अनावश्यक अडथळे येऊ नयेत, यासाठी महानगरपालिका सहकार्याची भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीमुळे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांच्या प्रश्नांना प्रशासकीय स्तरावर दिशा मिळणार असून, आरोग्यसेवा अधिक सक्षम व सुव्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

“शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांना नोंदणी प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध करण्यावर महानगरपालिका भर देत आहे. डॉक्टर आणि प्रशासन यांच्यातील समन्वय मजबूत करून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे.

*-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

क्लिनिक नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय सुधारणा करण्यात येतआहेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांना सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी वैद्यकीय विभाग कटिबद्ध असून, प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.

*-डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button