सचिन काळभोर यांची महापालिकेविरोधात तक्रार; १६ कोटींच्या अनुदानावरून खळबळ
स्मारक समितीला दिलेल्या निधीवर नियमभंगाचा आरोप; चौकशीची मागणी

– नियम डावलून कोट्यवधींची उधळण? महापालिकेविरोधात तक्रार
– महापालिकेचा निर्णय वादात; चौकशीसाठी मुख्यमंत्री दरबारी तक्रार
पिंपरी | चिंचवड :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने यशवंतराव चव्हाण स्मारक समिती यांना दिलेल्या तब्बल १६ कोटी रुपयांच्या अनुदानावरून भाजपचे माजी पदाधिकारी सचिन काळभोर यांनी गंभीर आक्षेप घेत लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, सन २०१८ ते २०२१, २०२२ ते २०२३ आणि २०२४ ते २०२५ या कालावधीत प्रत्येकी ५ कोटी रुपये, तसेच निवडणुकांनंतर १ कोटी रुपये अशा एकूण १६ कोटी रुपयांचा निधी स्थायी समितीच्या ठरावाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. संबंधित स्मारक समिती ही निगडी प्राधिकरण येथील राजकीय स्वरूपाची संघटना असल्याचा आरोपही काळभोर यांनी केला आहे.
महापालिकेला सेवा भावी संस्था व संघटनांना केवळ ३ लाख रुपयांपर्यंतच अनुदान देण्याचा अधिकार असताना, कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करणे हे नियमबाह्य असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यामागे राजकीय दबाव असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
या संदर्भात महापालिका आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.



