Site Logo
गुन्हेगारीपुणेमहाराष्ट्र

राहुरीत पोलिसावरच खुनी हल्ला; चार जणांसह अनोळखी ११ इसमांवर गुन्हा दाखल

राहुरी (प्रतिनिधी)

राहुरी : शहरातील ग्रीन हॉटेल चौक परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यावर लोखंडी गज, फायटर व लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना शनिवारी दि. ८ मार्च रोजी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ४ जणांसह ११ अनोळखी इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास रंगनाथ वैराळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे (सर्व रा. बुरुडगाव, ता. अहिल्यानगर) तसेच महेश निमसे पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही यांच्यासह इतर ११ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ८ मार्च रोजी रात्री सुमारे पावणेबारा वाजता ग्रीन हॉटेल चौक येथे आरोपी त्यांच्या स्कॉर्पिओ क्र. एम एच १६ सीटी ७० व विटकरी रंगाच्या स्विफ्ट कारमधून आले होते. त्यांच्या वाहनाला कंटेनर क्र. एन एल ०१ एजे १३०८ याचा धक्का लागल्याच्या कारणावरून ते कंटेनर चालकाला लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करण्याच्या तयारीत होते. ही घटना फिर्यादी पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्या बीट हद्दीत घडत असल्याने त्यांनी आपल्या मोबाईलद्वारे व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्यावरच हल्ला चढविला. आरोपींनी लोखंडी फायटर, लोखंडी गज व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच फिर्यादीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचाही प्रयत्न केला तसेच इतर अनोळखी आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान आरोपी महेश निमसे याने फिर्यादीचा मोबाईल हँडसेट जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक२२०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०८,११९(१), ११८(१), १८९(२), १९१(१), १९१(३), १९०, ११५(२), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही दखल घेतली असून, पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ करीत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button