Site Logo
महाराष्ट्रपुणे

राहुरीच्या निवासी नायब तहसीलदार **संध्या दळवी** यांनी पदाचा गैरवापर करून *महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979* चे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांना तात्काळ निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार **कर्णा जाधव** यांनी जिल्हाधिकारी **डॉ. पंकज आशिया** यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राहुरी प्रतिनिधी..
राहुरी :- जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राहुरी महसूल विभागाशी संबंधित तसेच नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्याशी संबंधित तक्रारीबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आपली बदनामी झाल्याचे कारण देत संध्या दळवी यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. तसेच पोलिसांकडे अदखलपात्र केस दाखल केली आणि न्यायालयातही दावा दाखल केला.

निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, संध्या दळवी या शासनाच्या नोकर असून त्या *पब्लिक सर्वंट* आहेत. त्यामुळे शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना न्यायालयात जाण्याचा अधिकार नाही. *महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979* मधील कलम 22 नुसार कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय न्यायालयात धाव घेता येत नाही, अशी तरतूद आहे.

तरीदेखील संध्या दळवी यांनी या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांनी जाणीवपूर्वक कर्तव्यपालनात कसूर केली तसेच पदाचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला आपली बदनामी झाल्याची भावना असल्यास शासनाची परवानगी घेऊनच पोलिसांकडे किंवा न्यायालयात दाद मागता येते. मात्र संध्या दळवी यांनी तसे न करता शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी अशा प्रकारचे कृत्य केल्यास *महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979* नुसार संबंधित कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई, निलंबन व शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे संध्या दळवी यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, अहिल्यानगरचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, महसूल विभागाचे प्रधान सचिव, महसूल विभागाचे उपसचिव तसेच नाशिक विभागीय आयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button