Site Logo
गुन्हेगारीपिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

गुन्हे शाखा, युनिट-२ पिंपरी-चिंचवडची उल्लेखनीय कामगिरी**

सराईत मोटारसायकल चोराकडून २१,६६,००० रुपये किंमतीच्या ४० मोटारसायकली जप्त – वाहन चोरीचे ३४ गुन्हे उघड**

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे यांनी सर्व गुन्हे शाखांना प्रभावी उपाययोजना राबवून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

दि. ०२/०३/२०२६ रोजी बावधन पोलीस ठाणे हद्दीत नांदे गावातून स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेल्याबाबत बावधन पोलीस ठाणे गु.र. नं. ७३/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून आरोपीस अटक करण्यासाठी हा गुन्हा गुन्हे शाखा, युनिट-२ कडे वर्ग करण्यात आला.

सपोआ (गुन्हे-१) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिपक खरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रविण दळे, नितीन ढोरजे तसेच इतर पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीने मोटारसायकल चोरी करून गेलेल्या मार्गावरील सुमारे ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून नागे उर्फ आश्पाक इसाक पठाण (वय ३२ वर्षे, रा. मु.पो. पाडळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यास नालेवाडी परिसरातून दि. ०७/०३/२०२६ रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत त्याची कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने दाखल गुन्ह्याव्यतिरिक्त अनेक मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीकडून एकूण **२१,६६,००० रुपये किंमतीच्या ४० मोटारसायकली जप्त** करण्यात आल्या असून त्याच्याकडून **पुणे जिल्ह्यातील वाहन चोरीचे ३४ गुन्हे उघडकीस** आले आहेत.

तपासादरम्यान आरोपी चोरीच्या मोटारसायकली **मुकुंद उद्धवराव हारदास (वय २५ वर्षे, रा. मु.पो. पाटोदा (मावा), ता. परतूर, जि. जालना)** यास विकत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. आरोपी लोकांना या मोटारसायकली फायनान्स कंपनीकडून हप्ते थकल्यामुळे जप्त केलेल्या गाड्या असल्याचे सांगून विकत असे.

चौकशीत असेही समोर आले की, आरोपी आश्पाक पठाण याला स्प्लेंडर मोटारसायकलची विशेष आवड होती. सुरुवातीला त्याने एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केली आणि त्यानंतर त्याला मोटारसायकल चोरी करण्याची सवय लागली. मागील दोन-तीन वर्षांपासून तो पाथर्डी येथून बसने पुण्यात येऊन मोटारसायकल चोरी करून घेऊन जात असे. काही मोटारसायकली तो एका ठिकाणी जमा करून ठेवत असे व मागणीनुसार त्या विकत असे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही वाहन चोरीचे सुमारे १० गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त मा. डॉ. शशिकांत महाबरकर, अपर पोलीस आयुक्त मा. बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त मा. सारंग आबाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) मा. डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) मा. डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व त्यांच्या पथकाने केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button