Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

अंबड पोलिसांची ‘फिल्मी स्टाईल’ कारवाई; रात्रीच्या अंधारात पाठलाग करून अट्टल चोरटा गजाआड!*

पावणे दोन किलो चांदीसह दुचाकी जप्त; अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

अंबड: प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके

अंबड : शहरातील सराफा दुकान फोडणाऱ्या आणि दुचाकीसह चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अंबड पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल पावणे दोन किलो चांदी आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे आंतरजिल्हा चोरीच्या टोळीचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकी घटना काय?

अंबड येथील सराफा लाईनवरील ‘राघव ज्वेलर्स’ हे दुकान फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी फिर्यादी विनोद गोविंदराव चित्राल यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक श्री. संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला असता, सुरुवातीला बाळू शिरसाट (रा. कुंभेफळ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार संतोष ओंकार गायकवाड (रा. तलवाडा, जि. बीड) असल्याचे निष्पन्न झाले.
अंधारात २ किलोमीटर थरारक पाठलाग
दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री मुख्य आरोपी संतोष गायकवाड हा कुंभेफळ शिवारातील एका शेतवस्तीवर येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शेतवस्तीला वेढा घातला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने मागच्या दरवाजाने पळ काढला. मात्र, पोलीस कर्मचारी अरुण मुंडे आणि तुकाराम मदन यांनी मध्यरात्रीच्या अंधारात तब्बल २ ते २.५ किलोमीटर पाठलाग करून आरोपीला शिताफीने जेरबंद केले.
अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली


आरोपीने चौकशीत राघव ज्वेलर्समधील चोरीसह इतरही अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यात प्रामुख्याने:
रांजणी (ता. घनसावंगी): सुदर्शन मांडवे यांचे सोन्या-चांदीचे दुकान आणि कौसर शेख यांचे कापड दुकान फोडल्याची कबुली.
वडीगोद्री (ता. अंबड): सुनील कुऱ्हाडे यांची मोटारसायकल (MH21 CC 3695) चोरी केल्याचे मान्य.
शेवगाव (जि. अहिल्यानगर): टाटा सफारी चारचाकी वाहन चोरी केल्याची कबुली.
जप्त केलेला मुद्देमाल
पोलिसांनी आरोपीकडून १ किलो ७४५ ग्रॅम चांदी आणि चोरीची एक मोटारसायकल जप्त केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून आणखी काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यांनी केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके, सपोनि अमोल गुरले, पोउपनि भगवान नरोडे, बी. बी. नरोडे, यशवंत मुंडे, दिपक पाटील, अरुण मुंडे, तुकाराम मदन, धनाजी गवळे, विजय केंद्रे, अशोक भांगळ, विनोद भानुसे आणि देवा डेंगळे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button