Site Logo
महाराष्ट्र

अंबड तालुक्यात ‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा धडाका; सर्व सरकारी सेवा आता एकाच छताखाली!

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार विजय चव्हाण यांचे नियोजनाचे आदेश; मार्च ते मे दरम्यान महसूल मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन*

अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके

अंबड :महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अंबड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-१)’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभागांची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली.


या अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे स्टॉल्स एकाच ठिकाणी असतील, ज्यामुळे नागरिकांना विविध दाखले आणि योजनांच्या लाभासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.
महसूलसह ‘या’ विभागांचा असणार सहभाग
शिबिरामध्ये केवळ महसूल विभागच नव्हे, तर कृषी, ग्रामविकास, आरोग्य, समाजकल्याण आणि महिला व बालविकास विभागाचा सक्रिय सहभाग असेल.
महसूल विभाग: फेरफार, डिजिटल ७/१२, जात, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, जमिनीचे वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतर.


ग्रामविकास व कृषी: घरकुल योजना, पीएम किसान, ॲग्रीस्टॅक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना.
महिला व बालविकास: ‘लाडकी बहीण’ योजनेचे अनुदान आणि एकल महिलांसाठीच्या विशेष योजना.
इतर सेवा: आयुष्मान भारत कार्ड, ई-मोजणी, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर.
असे असेल शिबिरांचे वेळापत्रक (वेळ: सकाळी १० पासून)
प्रशासनाने महसूल मंडळनिहाय तारखा जाहीर केल्या असून नागरिकांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर उपस्थित राहावे:
०७ मार्च: जामखेड | १४ मार्च: धनगरपिप्री | २२ मार्च: शहागड
२८ मार्च: वडीगोद्री | ०४ एप्रिल: रोहिलागड | १० एप्रिल: ताडहदगाव
१७ एप्रिल: गोंदी | २४ एप्रिल: सुखापुरी | ०८ मे: अंबड शहर (नगर परिषद स्तर)
“प्रशासकीय सेवा लोकाभिमुख करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी गावपातळीवर लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून शेवटच्या माणसापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवावा.”
— विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड
जनजागृतीसाठी विशेष मोहीम
या शिबिरांना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. शिबिराची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दवंडी, सोशल मीडिया आणि भिंतीपत्रकांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी आणि महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button