Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

राहुरीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गैस कटरच्या सहाय्याने चोरी, २५ लाखांची चोरी

वांबोरी : राहुरी शहरात आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली आहे. नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल २५ लाख ६७ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून ही चोरी करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी शहरातील संत गाडगेबाबा व्यापारी संकुल आणि संत गाडगेबाबा आश्रम शाळेच्या समोर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. काल ( १३) रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अज्ञात भामट्यांनी या एटीएमला लक्ष केले. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन कापले आणि त्यातील २५ लाख ६७ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केली.

1742008913914
चोरीची ही धक्कादायक घटना उघडकीस येताच पोलीस प्रशासनात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते आणि हवालदार संदीप ठाणगे यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेता अहिल्यानगर येथून विशेष श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
‘राणी’ नावाच्या श्‍वानाने घटनास्थळावरून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र एटीएम केंद्राच्या बाहेरच श्वान घुटमळले. यामुळे चोरट्यांनी पसार होण्यासाठी वाहनाचा वापर केला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.


भरवस्तीत आणि महामार्गालगत असलेल्या एटीएममध्ये इतकी मोठी चोरी झाल्याने राहुरी शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला आव्हान दिल्याची चर्चा नागरिक करत आहेत. याप्रकरणी बँकेचे प्रतिनिधी संकेत चंद्रशेखर वैद्य यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वैद्य यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आहेर हे करत आहेत. महामार्गावरील सीसीटीव्ही आणि संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलीस चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध पथके तैनात करण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button