Site Logo
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाच महापौर होणार नाही…

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विश्वास, शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला शुभारंभ...

पिंपरी – केंद्रात, राज्यात सत्तेत एकत्र असल्याने भाजपसोबत युती करण्यासाठी प्रचंड मेहनत केली. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, ठीक आहे. त्यांनी गाफील ठेवले. युती केली नाही. शेवटच्या तासाभरात शिवसेनेला ताकदीचे ६१ उमेदवार मिळतील का असे त्यांना वाटले नसेल. पण, शिवसेनेला ताकदीचे उमेदवार मिळाले. त्यामुळे शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाच महापौर होऊ शकत नाही, असा विश्वास शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. प्रचारात टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आपण काय कामे करणार आहोत. हे जनतेला सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, सुलभा उबाळे, महानगरप्रमुख राजेश वाबळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, शहरप्रमुख नीलेश तरस, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजीत बारणे, बाळासाहेब वाल्हेकर, राजेंद्र तरस, जिल्हा संघटिका शिला भोंडवे उपस्थित होते.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांना भुईसपाट केले जाईल. अनेक उमेदवार नवीन आहेत. या उमेदवारांनी मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरावे. समोरच्यावर टीका करु नये, कोणाची उणीदुणी काढू नये. आपण किती चांगले काम करणार आहोत, हे सांगावे. जनता टिका-टिप्पणीला कंटाळली आहे. कोणावरच टीका करायची नाही. टीका केल्याने मते वाढत नाहीत. नम्रतेने लोकांसमोर जावे. पिंपरी-चिंचवडसाठी एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे. शास्तीकर माफ करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे त्याचे श्रेय कोणी घेऊ नये. शिवसेनेचे बरचेसे काम उपमुख्यमंत्री अजित पवार हलके करत आहेत.

  • त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नाही. फक्त अजित पवार जे म्हणतील त्याला मम म्हणत जाऊ, आपण काही विकास कामे करणार आहोत, हे जनतेला सांगावे. शिवशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. समोर धनाढ्य लोक आहेत. आपल्याकडे संघर्ष करणारा शिवसैनिक आहे. संघर्ष करणारा शिवसैनिक धनशक्तीला भुईसपाट करुन जिंकल्याचा इतिहास आहे. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.


शिवसेनेच्या विश्वासघाताची ही निवडणूक आहे. समोरच्यांच्या भ्रष्टाचाराची आहे. त्यांच्या कारभाराला चपराक देणारी निवडणूक आहे. संघर्षशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांच्या नशिबी संघर्ष आला आहे. स्वबळावर लढत असलो, तरी एकनाथ शिंदे यांची पूर्ण ताकद सर्व उमेदवारांच्या पाठिशी आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आणि राबविली. पृथ्वी तलावर जोपर्यंत चंद्र आणि सुर्य आहे, तोपर्यंत ही योजना बंद होऊ शकणार नाही. आपण आपल्याला कमकवूत समजायचे नाही. समोरच्याला कमकूवत समजावे. आपले बरेचसे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण करणार आहे. आपल्याला फक्त लोकांपर्यंत पोहचावे. घरोघरी जाऊन प्रचार करावा. शेवटच्या तीन दिवसात दबाव, दादागिरीचे राजकारण केले जाऊ शकते. या सगळ्या गोष्टीसमोर छातीठोकपणे उभे रहावे. ज्यांना स्वत:च्या अस्तित्वाची पडली आहे, ते पत्रकार परिषद घेतात. टीका-टिप्पणी करतात. हा भानगडीत आपल्याला पडायचे नाही. आपण सोबत असतो, तर काही लोकांची ढाल बनलो असतो. पण, त्यांना आपण नकोच आहेत. त्यामुळे लाचारी करायची देखील काही गरज नव्हती. शिवसैनिकांना न्याय देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button