मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, १ कोटी ३० लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त; तस्करी प्रकरणी एकास अटक…
प्रतिनिधी पिंपरी संतोष माने

पिंपरी :-गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ३० लाख रुपये किमतीची १ किलो ३८० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी (अँबरग्रीस) जप्त केली असून या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलिस अंमलदार हर्षद कदम यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत गडदे, विनोद वीर, हर्षद कदम, विशाल गायकवाड, सोमनाथ मोरे व औदुंबर रोंघे यांच्या पथकाने आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतील घोलप वस्ती, मरकळ रोड, आळंदी (पुणे) येथे सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत शुभम पद्माकर अडगळे (वय २३, रा. घोलप वस्ती, आळंदी, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे विक्रीसाठी आणलेली व्हेल माशाची उलटी ही त्याचा साथीदार अक्षय वारणकर याच्याकडून मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जप्त केलेली अँबरग्रीस आंतरराष्ट्रीय बाजारात अत्यंत मौल्यवान मानली जाते.

या प्रकरणी आळंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी आरोपीस आळंदी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (अतिरिक्त कार्यभार), मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली



