प्रतिनिधी परमेश्वर कांबळे
सांगली :- शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या खुनाचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तूलांसह तिघा संशयित आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
जिल्ह्यातील गंभीर गुन्हे आणि अवैध शस्त्रांविरोधात कारवाई करण्याच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही मोहीम राबवली. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पाटणे प्लॉट ते अंकली काळीवाट रस्त्यावर सापळा रचण्यात आला.
राजू गंगावणी यांच्या शेताजवळ पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या मारुती ८०० कारमधून तिघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान गणेश चंद्रकांत लोखंडे आणि विराज प्रकाश बुटाले यांच्या ताब्यातून प्रत्येकी एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. कारमधून धारदार चाकूदेखील हस्तगत करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी प्रतिष्ठित व्यावसायिक व दैनिक जनप्रवासचे संचालक संजय भोकरे यांच्या खुनाचा कट रचल्याची कबुली दिली. जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेला वाद आणि आर्थिक फायद्यासाठी हा कट आखण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी संजय भोकरे यांच्या हालचालींची रेकी केली होती. दर शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या कार्यालयाजवळ हल्ला करण्याचा त्यांचा कट होता. यासाठी आरोपींनी फेब्रुवारी २०२६ मध्ये Sonbhadra येथून दोन पिस्तुले आणि आठ काडतुसे खरेदी केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. संशय टाळण्यासाठी आरोपींनी वापरलेल्या कारवर बनावट नंबर प्लेट लावली होती.
या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संग्राम संभाजी फडतरे यालाही अटक करण्यात आली असून सचिन आवळे हा मुख्य आरोपी सध्या फरार आहे.
- पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुषार जोशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी नसून जमीन व्यवहार आणि आर्थिक कारणे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
