अवैधरित्या धारदार ४ शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीस चाकण पोलिसांकडून अटक
प्रतिनिधी :- संतोष माने

चाकण :- चाकण पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोहितेवाडी, ता. खेड, जि. पुणे येथील शाळेच्या मागील मोकळ्या जागेत एक इसम अवैधरित्या धारदार शस्त्रांसह थांबलेला आहे.
सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचून संबंधित इसमास ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून ०२ लोखंडी तलवारी व ०२ लोखंडी सुरे असा एकूण अंदाजे किंमत रु. २,८००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी शरद परशुराम पोतले (वय ४४ वर्षे, रा. मोहितेवाडी, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पोलीस हवालदार भैरोबा यादव, योगेश कोळेकर, प्रीतम ढमढेरे तसेच पोलिस अंमलदार महेश कोळी, शिवाजी लोखंडे, सुमीत जगझाप, रमेश कांबळे आणि संतोष फटांगरे यांनी संयुक्तरित्या पार पाडली.
पुढील तपास चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कोळेकर करीत आहेत.
— चाकण उत्तर पोलीस ठाणे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय



