Site Logo
गुन्हेगारी

जावयानेच केली सासर्‍याच्या घरासमोर काळी जादू; देवळाली प्रवरेतील धक्कादायक प्रकार

राहुरी (प्रतिनिधी)

राहुरी : काळी जादू नि अघोरी प्रकाराचे पेव सध्या सर्वत्रच सर्रास नजरेस पडत आहे. या अघोरी काळ्या जादूला समाजातून पाठिंबा मिळतोयं हे निश्चितच धोकादायक आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा अनिष्ट गोष्टिंना थारा मिळणं निंदनीय आहे, बरोबरच समाजविघातक असल्याचे प्रतिक आहे. काळ्या जादूने इतरांना त्रास देता येतो. यावर विश्वासच कसा बसतो. हे प्रश्नचिन्ह असले तरी मात्र हे राहुरी तालुक्यात घडलयं हे वास्तव आहे.

तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रस्त्यालगत असलेल्या पठारे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जादूटोण्याच्या प्रकार करून जावयाने सासऱ्याच्या घरासमोरच अघोरी स्वरूपाची पूजा करत कुऱ्हाडीच्या साहाय्याने जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
देवळाली प्रवरा येथील पठारे वस्तीवर राहणारे गोविंद गंगाधर पठारे यांच्या घरासमोर रात्री एक वाजल्यानंतर संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसून आले. घराबाहेर टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली, हळद-कुंकू, गलोर, दोरी आणि कुऱ्हाड अशा वस्तूंसह पूजा सुरू असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.
गेटचा आवाज झाल्याने घरातील सदस्य जागे झाले. बाहेर पाहिले असता चार जण संशयास्पद विधी करत असल्याचे दिसले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरले; मात्र धाडस दाखवत त्यांनी पाठलाग करून चौघांपैकी एकाला पकडण्यात यश मिळवले. संबंधित व्यक्तीस राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मध्यरात्री जादूटोण्यासारखा विधी, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आणि जीवघेण्या हल्ल्याचा आरोप या सर्व घटनांमुळे पठारे वस्ती व देवळाली प्रवरा परिसरात भीतीदायक वातावरण झाले असून चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कुणालाही जादुटोणा तंत्र मंत्र कुणालाही करता येत नाहीत. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, उलट असे प्रकार करणाऱ्या लोकांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई केली पाहिजे. असे तंत्र मंत्र करून कुणाला हानी पोहोचवता येत असती तर शासनाने सीमेवरील सर्व सैन्य काढून हे तंत्र मंत्र करणाऱ्या बुवांनाच त्या सीमेवर बसवले असते. मात्र तसे काही होत नाही. ही केवळ अंधश्रद्धा आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये.
देविदास देसाई, माजी जिल्हा संघटक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button