Site Logo
पुणेमहाराष्ट्र

महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडित याच्याविरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी

पुणे : पुणे शहरातील टिळक रस्त्यावर आंदोलनादरम्यान महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडित याच्याविरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (३० मार्च) घडलेल्या या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील एका प्रकरणाच्या निषेधार्थ टिळक रस्त्यावर आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी संबंधित महिला पत्रकार घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यावेळी संतोष पंडित घटनास्थळी येऊन पत्रकारांवर संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत बोलू लागला.

यावेळी त्याने महिला पत्रकाराच्या कपड्यांवरून अश्लील टिप्पणी केली तसेच अपमानास्पद हावभाव केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित पत्रकाराच्या इच्छेविरुद्ध मोबाईलद्वारे चित्रीकरण केल्याची बाबही समोर आली आहे. आंदोलनात सहभागी इतर महिलांनाही त्याने धमकावत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी महिला पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 75, 78, 352, 351(1) आणि 296 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून सुरू असून अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. तसेच सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी काहीजण मर्यादा ओलांडत असल्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button