
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि. २ मार्च २०२६ जाहीर करण्यात आली आहे. मात्र शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या आल्यामुळे इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाल्याची तक्रार समोर येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. कमी वेळेमुळे कागदपत्रे गोळा करण्यासाठी मोठी धावपळ होत असून अनेक इच्छुक उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तात्काळ दखल घेऊन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी आणि पात्र उमेदवारांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



