*जळगांव हादरले, शाळेत गेली… परतलीच नाही! नऊ वर्षीय मुलीचा मृतदेह अखेर विहिरीत सापडला, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला !
संभाजी पुरीगोसावी (जळगांव जिल्हा ) प्रतिनिधी.

जळगांव जिल्ह्यातील तरवाडे बुद्रुक ता. (चाळीसगांव) येथे शाळेत गेल्यानंतर शुक्रवारी अचानक बेपत्ता झालेल्या नऊ वर्षीय मुलीचा मृतदेह अखेर मंगळवारी एका विहिरीत सापडला. याप्रकरणी चाळीसगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून धनश्री उमेश शिंदे असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शुक्रवारी सकाळी 10 वाजता धनश्री ही शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र शाळा सुटल्यानंतर सायंकाळ होऊनही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान पोलीस ठाण्यातही धनश्री बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रानंतर पोलिसांनी ही तातडीने तिचा तपास सुरू केला होता. दरम्यान तरवाडे गावालगत असलेल्या एका विहिरीत पाचव्या दिवशी धनश्रीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरांत एकच खळबळ उडाली. धनश्रीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखेसह व पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू असून सर्व शक्य बाबी तपासल्या जात आहेत. पाच दिवसांनी सुरू असलेल्या या शोध मोहिमेचा असा दुर्दैंवी शेवट झाल्याने धनश्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर तरवाडे गावावर शोककळा पसरली आहे.*



