जालना प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अटक केली आहे. तब्बल चार महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या पीडितेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमकी घटना काय?
चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील खादगाव येथील एका ३९ वर्षीय महिलेने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रार दिली होती. त्यांच्या अल्पवयीन मुलीला माळशेंद्रा (ता. जि. जालना) येथील आरोपी दीपक राजू जाधव (वय २५) याने फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अनेक दिवस तपास करूनही आरोपी आणि पीडिता मिळून येत नव्हते.
गुन्हे शाखेची कामगिरी
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंह संधू यांनी २१ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी आणि पीडिता हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव (वाळूज) परिसरात असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी माउली नगर, कमळापूर (ता. गंगापूर) येथे छापा टाकून आरोपी दीपक जाधव याला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीची सुटका केली. या दोघांनाही जालना येथे आणून पुढील तपासासाठी चंदनझिरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, प्रशांत लोखंडे, रेणुका बाडे, सौरभ मुळे आणि सायबर सेलचे संदीप माटे यांनी यशस्वी केली.
*ब्युरो रिपोर्ट, न्यूज एक्सप्रेस १८,
**Facebook | Twitter | Pinterest | LinkedIn**
