पिंपरी, प्रतिनिधी:– .दि. 29 मे 2026 : पिंपरी-चिंचवड शहरातील स्पाईन रोड लगत असणारी भीमशक्ती नगर परिसरातील विद्युत वायर्स खाली लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी विश्वनाथ लहाने
कार्यकारी अभियंता भोसरी विभाग महावितरण यांच्या कडे लेखी तक्रार दाखल करून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, स्पाईन रोड लगतं भीमशक्तीनगर परिसरातील दाट लोकवस्तीच्या भागात विद्युत तारा अत्यंत खाली आल्या असून, नागरिकांच्या घरांजवळ तसेच रस्त्यालगत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात सुमारे 10 हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून दररोज मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांची वर्दळ असते.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, मागील काही वर्षांपासून ही समस्या कायम असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वादळी वाऱ्यामुळे किंवा पावसाळ्यात या तारा तुटण्याची शक्यता वाढत असून त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मारुती जाधव यांनी महावितरण विभागाकडे तात्काळ पाहणी करून लोंबकळणाऱ्या विद्युत तारा उंचावणे, आवश्यक दुरुस्ती करणे आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांच्या जीविताशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याने महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
*न्यूज एक्सप्रेस १८ विशेष वृत्त.**
*वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत! ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एक्सप्रेस १८.*
