प्रतिनिधी :- दादाराव कांबळे
**पिंपरी-चिंचवड:**
शहरातील एका भागात भररस्त्यात असलेला आणि परिसराला प्रकाश देणारा विद्युत खांब (पोल) अचानक पूर्णपणे काढून टाकण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. लोकप्रतिनिधींच्या या निर्णयामुळे “आम्ही उजेडातून पुन्हा अंधाराच्या साम्राज्यात ढकलले जात आहोत का?” असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.
### शॉक लागण्याचे कारण की दुसरेच काही रहस्य?
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे लोकप्रतिनिधी आणि नेते नेताजी शिंदे यांनी, “या उंच विद्युत खांबामुळे जवळच राहणाऱ्या नागरिकांच्या घरांना शॉक बसतो,” असे कारण पुढे करत हा खांब तेथून हटवण्याची मोहीम राबवली आहे.
परंतु, जागरूक नागरिकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. जर विद्युत खांबामुळे शॉक बसत होता किंवा तांत्रिक बिघाड झाला होता, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) विद्युत विभागाच्या माध्यमातून तो दोष दुरुस्त करणे गरजेचे होते. खांब दुरुस्त करण्याऐवजी तो थेट मुळासकट काढून टाकण्याचा अजब अट्टाहास का केला गेला? यामागे ‘शॉक’चे कारण नसून दुसरेच काहीतरी गूढ रहस्य दडले असल्याची चर्चा आता परिसरात रंगली आहे.
### माजी नगरसेवकांच्या कारकिर्दीची आठवण
या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांना माजी नगरसेवक (कै.) बाबू हरी भंडारी यांच्या कार्यकाळाची आठवण झाली आहे. भंडारी यांच्या कारकिर्दीत या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होऊन नागरिकांना अंधारातून उजेडात आणण्याचे काम झाले होते, असे नागरिक सांगतात. मात्र, आताच्या लोकप्रतिनिधींच्या अशा निर्णयांमुळे मिळालेल्या सुख-सुविधा वाढण्याऐवजी त्या कमी केल्या जात असल्याचा आरोप होत आहे.
### लोकांवर नेमका कोणाचा दबाव?
लोकांना अंधारात ठेवून आणि विश्वासात न घेता हे काम घाईघाईने का केले जात आहे, हा मोठा प्रश्न आहे. हा खांब हटवण्यासाठी लोकप्रतिनिधींवर किंवा प्रशासनावर असा कोणाचा दबाव आणि धबधबा आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता स्थानिकांवर आली आहे.
आपल्या हक्काच्या मूलभूत सुविधा हिरावून घेणाऱ्या या कारभारामागे नक्की काय गौडबंगाल आहे, याचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
न्यूज एक्सप्रेस १८ विशेष वृत्त.**
*वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत! ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एक्सप्रेस १८.*
