प्रतिनिधी परमेश्वर कांबळे
चिखली, दि. ६ जून : चिखली पोलिसांच्या हद्दीत कुदळवाडी परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत तब्बल ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ, कुदळवाडी येथे छापा टाकण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट सुपारी आणि तत्सम पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
या प्रकरणात रुस्तमखान, बाबरखान, नबीखान, वैभव अर्जुन यादव, राजू श्रीवास्तव आणि मनोज चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा बेकायदेशीर साठा करून विक्रीसाठी ठेवला होता, असे तपासात समोर आले आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ६,१९,९८२ रुपये इतकी असून या पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात, हे माहिती असतानाही आरोपींनी बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोमारे करीत आहेत.
**न्यूज एक्सप्रेस १८ विशेष वृत्त.**
*वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत! ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एक्सप्रेस १८.*
