Site Logo
गुन्हेगारीमहाराष्ट्र

श्रीरामपूर हादरलं! शाळेच्या आड **लपलेली हैवानियत उघड —* *लिंगपिसाट शिक्षक अटकेत, दोषींना कठोर शिक्षा देण्याची* *जोरदार मागणी*

राहुरी प्रतिनिधी* : *चंद्रकांत जगधने*

श्रीरामपूर : शिक्षणाचं पवित्र मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेतच जर चिमुकल्यांची सुरक्षितता धोक्यात येत असेल, तर ही व्यवस्था कुजलेली आहे, हे मान्य केल्याशिवाय पर्याय नाही! श्रीरामपूर शहरातील एका नामांकित मराठी शाळेत शिक्षकाच्या रूपात वावरणाऱ्या नराधमाने इयत्ता दुसरीतील चार निष्पाप मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.


सचिन महाजन गोणारकर (वय ३५, रा. गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, सध्या मुक्काम वार्ड नं. ०७, श्रीरामपूर) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्याची नियुक्ती १ ऑगस्ट २०२५ रोजी पवित्र पोर्टलद्वारे करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्याने शिक्षक या पवित्र पदालाच काळिमा फासणारा कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
पीडित विद्यार्थिनींनी घरी आपबिती सांगित्यानंतर संतप्त पालकांनी थेट शाळा गाठून जाब विचारला. मात्र, प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ नये, यासाठी संस्थेच्या प्रमुखांकडून दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. ही बाब म्हणजे गुन्हा दडपण्याचा प्रयत्न असून, दोषींना पाठीशी घालण्यासारखीच आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया पालक व नागरिकांतून उमटत आहे.


अखेर पालकांनी ठाम भूमिका घेत शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर शहर हादरून गेले असून, पालकवर्गात भीती, संताप आणि तीव्र अस्वस्थतेचे वातावरण आहे. शाळा सुरक्षित नसतील, तर मुलांना शिक्षणासाठी पाठवायचं तरी कुठे? असा थेट सवाल आता पालक करत आहेत.
ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवणारी आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, दोष झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल व्हावेत आणि शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने फेरआढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button