
पिंपरी :-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने तयारीला वेग दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठित करण्यात आली आहे.

या समन्वय समितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाबू नायर, मनोज कांबळे, सचिव निगार बारस्कर, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे तसेच चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेश नबले यांचा समावेश आहे.
ही समन्वय समितीने आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तसेच अन्य मित्र पक्षांशी आघाडीबाबत चर्चा करणार आहे. तसेच जिल्हा निवड मंडळाच्या बैठकीनंतर समन्वय समितीने सविस्तर चर्चा करून इच्छुक उमेदवारांची यादी व शिफारसी राज्य निवड मंडळासमोर सादर कराव्यात, असे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.





