Site Logo
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही – आमदार सुनील शेळके…

मावळ प्रतिनिधी

 

मावळ :-पंचायत समिती मावळ अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला घेणारी महत्त्वपूर्ण बैठक आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीदरम्यान प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी व ग्रामसेवक यांना उद्देशून आमदार शेळके यांनी स्पष्ट शब्दांत सूचना देत कामांमध्ये कोणतीही दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा निकृष्ट दर्जा सहन केला जाणार नसल्याचे ठामपणे बजावले.

जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेली सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या असून, ज्या ठेकेदारांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यांना काळ्यायादीत टाकून कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील मंजूर घरकुल योजनांच्या कामांना नियुक्त ठेकेदारांनी तात्काळ सुरुवात करावी, यासाठी भूमिअभिलेख व वन विभागाकडील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.


शिक्षण विभागाचा आढावा घेताना पोषण आहार, विद्यार्थ्यांचे कपडे व बूट यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आमदार शेळके यांनी दिले. शाळांची पटसंख्या वाढविणे, शाळांमध्ये स्वच्छतागृह व शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, तसेच येणाऱ्या शालेय क्रीडास्पर्धा भव्य स्वरूपात घेण्याबाबत अधिकारी व शिक्षकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. आदर्श शाळांच्या कामांचा आढावा घेऊन उर्वरित शाळांसाठी CSR अंतर्गत निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.

तालुक्यातील पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकाम विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील कामांना आचारसंहितेपूर्वी वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.

याशिवाय रोजगार हमी योजना, शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना तसेच कृषी विभागाच्या योजनांचा एकत्रित आढावा घेण्यात आला. येत्या काळात या सर्व योजना प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे राबविण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आमदार सुनील शेळके यांच्याकडून देण्यात आल्या. पंचायत समिती इमारतीची दुरुस्ती व डिजिटलायझेशन करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश आमदार शेळके यांनी दिले.

ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळावी व शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात, यासाठी तालुका स्तरावर ग्रामसेवकांमध्ये स्पर्धा आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आले असून, त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, पंचायत समितीचे सर्व विभागप्रमुख, ग्रामसेवक तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, भूमिअभिलेख, विद्युत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले असून, कामे त्वरित सुरू करणे, दर्जा राखणे आणि जबाबदारी निश्चित करणे याबाबत आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट व ठोस निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button