राहुरी (प्रतिनिधी) : राहुरीतील बंदीखान्यात कैद्यांना जेवण देणाराच कैद्यांना चक्क दारुचा पुरवठा करत असल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून बिनदिक्कतपणे जेलमध्ये हा सर्व प्रकार चालत होता. जेलप्रशासन मात्र प्रकरणी अनभिज्ञ असल्याचे चित्र होते. अखेर कर्तव्यावर असलेल्या हवालदार सानप यांना संशय आल्याने, अखेर हे रॅकेट उघड होत, पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहितीनुसार, दिनांक ३० मे २०२६ रोजी राहुरी येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांना भत्ता पुरवणारे अधिकृत पुरवठादारांचा प्रतिनिधी किशोर भाऊसाहेब वाहूरवाघ (वय ४०) राहणार मुलनमाथा राहुरी याने कैद्यांना भत्ता आणला असता, गार्ड ड्युटीवर हजर असणारे पोलीस हवालदार रामनाथ सानप यांनी सदर भत्त्याची पाहणी केली. पाहणीत त्यांना त्यामध्ये कैद्यांना बंदी असलेले पदार्थ मिळून आले. तसेच किशोर वाहूरवाघ याला यासंबंधात विचारले असता तो अडखळत बोलत असल्याचे निदर्शनास आल्याने, त्याबाबत पोलीस हवालदार रामनाथ सानप यांनी सब जेलर खामकर यांना लेखी रिपोर्ट देऊन बोलावून घेत, सदर भत्त्याची पाहणी करण्याबाबत कळविले. त्यावरून सबजेलर खामकर यांनी सदर अखाद्य व अपेय पदार्थाची पाहणी केली असता, त्यांना त्यात कैद्यांना देण्यास बंदी असलेले पदार्थ दिसून आले. त्याबाबत त्यांनी सदर अखाद्यपदार्थाचा पंचनामा तसेच दिनांक २९ मे २०२६ रोजीही सायंकाळचे जेवणावेळी त्यांनी कैद्यांना अपेय असे पाणी (वास येत असलेले) आणले होते. त्याबाबत पोलीस हवालदार नागरगोजे यांनी सबजेलर खामकर यांना कळविले होते. त्यावरून त्यांनी पाहणी केली असता, त्यांना त्यात दारू असल्याचे निदर्शनास आले होते.
त्यावरून आज दिनांक ३० मे रोजी सबजेलर रामचंद्र पांडुरंग खामकर महसूल सहाय्यक तहसील कार्यालय राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात किशोर भाऊसाहेब वाहूरवाघ यांचे विरुद्ध तक्रार दिली आहे. त्यावरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६३२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २२३ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५(१) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गीते करीत आहेत.
तसेच सदर आहार भत्ता पुरवठादारावर कायदेशीर कारवाई करण्याकरिता राहुरी पोलिसांनी जेलअधीक्षक यांचेकडे अहवाल पाठविला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
*ब्युरो रिपोर्ट, न्यूज एक्सप्रेस १८,
**Facebook | Twitter | Pinterest | LinkedIn**
