पिंपरी (प्रतिनिधी): परमेश्वर कांबळे
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्रांविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट-१ ने मोठी कारवाई केली आहे. देहूरोड परिसरात व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आपली यंत्रणा अधिक सतर्क केली असून, या कारवाईत एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९ देशी कट्टे, ५ मॅगझिन आणि ४६ जिवंत काडतुसे असा एकूण ८ लाख रुपये किमतीचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. अझरुद्दीन रफिक सुतार (वय ३०, रा. थेरगाव, पुणे)
२. वैभव अशोक शेटे (वय ३१, रा. थेरगाव, पुणे)
३. सौरभ धनंजय जाधव (वय २७, रा. पाषाण, पुणे)
४. अक्षय अशोक कांबळे (वय २१, रा. पाषाण, पुणे)
नेमकी घटना काय?
काही दिवसांपूर्वी देहूरोड परिसरात एका व्यापाऱ्यावर गोळीबार करून हत्या केल्याची गंभीर घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे आणि त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत अवैध शस्त्रांची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या साहित्याची झडती घेतली असता ९ पिस्तूल, मॅगझिन, जिवंत काडतुसे आणि दोन वाहने असा एकूण ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस पथकाची कामगिरी:
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग करत आहेत.
