**’ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत राहुरी पोलिसांनी आतापर्यंत ११० मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले**
**राहुरी / अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी):**
पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात राहुरी पोलिसांना मोठे यश आले आहे. राहुरी पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत मुलीची सुटका केली असून, आरोपीला ताब्यात घेतले आहे. राहुरी पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अभियानांतर्गत आतापर्यंत तब्बल ११० हरवलेल्या व अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.
विश्रांतवाडी (पुणे) येथील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २१ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली होती. ती परत न आल्याने मुलीच्या पालकांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २४९/२०२६ बीएनएस १३७(२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
### 📍 गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचा छापा
या गुन्ह्या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल माने यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती दिली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ठेंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी विकी शिवाजी अमोलिक (वय ३० वर्ष, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर, सध्या रा. वडनेर, ता. राहुरी) हा त्या अल्पवयीन मुलीला घेऊन वडनेर गावच्या शिवारात लपून बसला आहे.
माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार प्रमोद ढाकणे व उमेश शेख यांनी कनगरचे पोलीस पाटील मुसमाडे यांची मदत घेतली आणि वडनेर येथील एका पोल्ट्री फार्मवर छापा टाकला. या छाप्यात आरोपी विकी अमोलिक याच्या ताब्यातून अपहृत मुलीची सुटका करण्यात आली. पोलिसांनी पीडिता आणि आरोपीला राहुरी पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाईसाठी विश्रांतवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
### 👮 या पथकाने केली धडक कारवाई:
सदर कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर), उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर (श्रीरामपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. प्रवीण बागुल, सुरज गायकवाड, राहुल यादव, पोकॉ. प्रमोद ढाकणे, उमेश शेख, सतिष कुऱ्हाडे, नदीम शेख तसेच पोहेकॉ. सचिन धनाड, पोहेकॉ. दरेकर आणि पोना. वेताळ यांच्या पथकाने केली आहे.
**ब्युरो रिपोर्ट, न्यूज एक्सप्रेस १८, अहिल्यानगर**
**Facebook | Twitter | Pinterest | LinkedIn**
