प्रतिनिधी :- परमेश्वर कांबळे
पिंपरी (दि. ६ मे २०२७):** “पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष आपली भूमिका सक्षमपणे पार पाडण्यात अपयशी ठरला आहे. राज्यात भाजपसोबत सत्तेत असलेले हे पक्ष महापालिकेतही भाजपला पूरक भूमिका घेत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील विरोधी पक्ष ही भाजपची ‘बी’ टीमच आहे,” अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष **चेतन पवार** यांनी केली.
पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा प्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, अमोल निकम, ज्ञानेश्वर शिंदे, राजाराम कुदळे, पार्थ गुरव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
### **गुन्हेगारीच्या घटनांवरून संताप; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**
पत्रकार परिषदेपूर्वी, नसरापूर आणि पुणे येथील सहकारनगर भागात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे शिवसैनिकांनी निदर्शने केली. “राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,” अशी मागणी चेतन पवार यांनी केली. तसेच या प्रकरणी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला.
### **भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयात जाणार**
महानगरपालिकेच्या कारभारावर बोट ठेवताना पवार म्हणाले की, “तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात महापालिका कर्जबाजारी झाली आहे. ५२ कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराबाबत आम्ही सखोल माहिती घेत असून याविरोधात लवकरच न्यायालयात दाद मागितली जाईल.” महापालिकेत सध्या शिवसेनेचा प्रतिनिधी नसला तरी प्रशासनाच्या भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्यासाठी पक्षाचे स्वतंत्र **’प्रतिनिधी मंडळ’** नेमले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
### **संघटन बांधणीवर भर**
पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पवार म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा संघर्षाचा वारसा पुढे नेत, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेल. आगामी काळात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांतील जुन्या-नव्या शिवसैनिकांची मोट बांधून सक्षम शहर कार्यकारणी जाहीर केली जाईल.”
*आगामी आंदोलनाचा इशारा**
पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी, महिला सुरक्षा, आरोग्य आणि बेरोजगारी अशा नागरी समस्यांवर शिवसेना आता आक्रमक होणार आहे. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून भाजप आणि त्यांच्या ‘बी’ टीमचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
—
