पिपरी-चिंचवड शहरात ‘शिवराय’ या पुस्तकाच्या खरेदीवरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने या पुस्तकाच्या ५,००० प्रती खरेदी करण्यास मंजुरी दिली असून, विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करण्याचा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जात आहे.
हे पुस्तक लेखक नामदेव जाधव यांनी लिहिले असून, ती पुस्तके शाळा, वाचनालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वितरित केली जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती मिळावी, हा उद्देश प्रशासनाचा आहे.
मात्र, या निर्णयावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर मतभेद दिसून येत आहेत. काही जणांनी या उपक्रमाचे स्वागत केले असले, तरी सचिन काळभोर यांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. त्यांनी सार्वजनिक निधीच्या वापराबाबत तसेच खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
सचिन काळभोर यांचा आरोप आहे की, नामदेव जाधव हे विषयातील तज्ञ नसून केवळ राजकीय हेतूने पुस्तक खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू केला आहे. तसेच, या प्रक्रियेमुळे महानगरपालिका प्रशासन दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी सामाजिक माध्यमांवर नागरी समस्यांबाबत पोस्ट शेअर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणारे जाधव आता थेट पुस्तक व्यवहारात उतरल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, हा विषय शहरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, पुढील निर्णय आणि घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता पिंपरी चिंचवड शहर
