Site Logo
पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

क्रांतिवीरांना अनोखी श्रद्धांजली: डब्ल्यूटीई (WTE) समूहातर्फे शैक्षणिक आणि क्रीडा साहित्याचे वाटप….

प्रतिनिधी पिंपरी

पिंपरी-चिंचवड: २३ मार्च, ‘हुतात्मा दिना’चे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी डब्ल्यूटीई (WTE) समूहाने एक विशेष सामाजिक उपक्रम राबविला. आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या वीरपुत्रांना मानवंदना म्हणून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेच्या ‘सीएसआर’ (CSR) उपक्रमांतर्गत अत्याधुनिक शैक्षणिक आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.


​ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल पाऊल
​तालसवाडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च माध्यमिक शाळेला पाच अत्याधुनिक ब्रँडेड संगणक, तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक टेबल आणि खुर्च्या भेट देण्यात आल्या. याप्रसंगी डब्ल्यूटीई फाउंडेशनच्या संचालिका सौ. वेदिका भोळे यांनी हे साहित्य शाळेच्या सुपूर्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.


​पिंपरी-चिंचवडमध्ये शैक्षणिक आणि क्रीडा क्रांती
​पिंपरी येथील क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित शिवराय पाटील शिक्षण संकुल (थेरगाव) येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि गरजा समजून घेण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे मोलाचे सहकार्य लाभले. रोटरीचे अध्यक्ष श्री. भरत चव्हाण आणि माजी अध्यक्ष श्री. जगदाळे सर यांच्या विशेष पुढाकारामुळे डब्ल्यूटीई या शाळेला सहाय्य करू शकली.
​याप्रसंगी शाळेला ७५ इंची अत्याधुनिक ‘इंटरॅक्टिव्ह पॅनल’, ७० वाकडी (डेस्क) आणि कुस्तीगीर मुला-मुलींच्या सरावासाठी दर्जेदार ‘रेसलिंग मॅट’ प्रदान करण्यात आली. या सोहळ्याला पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘क्रांतीगीताने’ उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी डब्ल्यूटीईचे जनरल मॅनेजर (फायनान्स) श्री. विवेक जोशी आणि एच.आर. मॅनेजर सौ. कावेरी चव्हाण उपस्थित होत्या.
​विकासासाठी सामाजिक बांधिलकीचे आवाहन
​डब्ल्यूटीई समूह पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर राहिले आहे. केवळ व्यावसायिक प्रगतीच नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा पोहोचाव्यात, हाच या उपक्रमाचा हेतू आहे. समाजातील इतर घटक आणि संस्थांनीही अशाच प्रकारे पुढाकार घेऊन शहराच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button