अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याची मागणी** *जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांचे निवेदन*
सिद्धार्थ कदम | प्रतिनिधी

महागाव :** तालुक्यात सुरू असलेल्या अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखावी तसेच कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार होऊ नयेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र काही ठिकाणी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जात नसल्याची तसेच आर्थिक व्यवहार करून नियुक्त्या मिळत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंगणवाडी मदतनीस पद हे महिला व बालकांच्या आरोग्य, पोषण व संगोपनाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे पद असल्यामुळे या पदासाठी पात्रता व गुणवत्तेनुसारच उमेदवारांची निवड होणे आवश्यक आहे. मात्र भरती प्रक्रियेतील गुणांकन, कागदपत्र पडताळणी तसेच अंतिम निवड याबाबत पारदर्शकता नसल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
📦 **मागणी**
अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने राबविण्यात यावी. तसेच आर्थिक व्यवहार किंवा इतर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद मुदस्सीर यांनी केली आहे.



