क्राइम प्रतिनिधी :- परमेश्वर कांबळे
**पिंपरी-चिंचवड:**महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचणाऱ्या एका सराईत आणि कुख्यात चैन स्नॅचरला अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या “गुन्हे शाखा युनिट-१” ला मोठे यश आले आहे. पोलिसांनी आरोपीचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्याला बाणेर परिसरातून धाडसाने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे चैन स्नॅचिंगचे ५ गंभीर गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून १५,००,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन स्पोर्ट बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
सुमित गोविंद इंगळे (वय ३१ वर्षे, सध्या रा. मामूर्डी गाव, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. श्रीपत पिंपरी, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या एकाकी (लोन वोल्फ) गुन्हेगाराचे नाव आहे.

### पिंपळे निलख येथील घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये
दिनांक ०३ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशालनगर, पिंपळे निलख येथील सुदर्शन पॅराडाईज (फेज-१) च्या मेनगेट समोरून पायी चालत जाणाऱ्या एका इसमाच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोन्याची चैन एका अज्ञात चोरट्याने स्पोर्ट बाईकवरून येत खेचून नेली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना गंभीर असल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्हे शाखेला तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

### १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ च्या दोन पथकांनी तपास सुरू केला. चोरट्यांचा येण्याचा आणि जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी पथकाने तब्बल १५० ते २०० सीसीटीव्ही फुटेजची अत्यंत बारकाईने पाहणी केली. या तपासणीत आरोपी हा यापूर्वी तळेगाव दाभाडे, देहूरोड आणि दापोडी भागात झालेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांतही सामील असल्याचे समोर आले. तसेच तो गुन्हे करण्यासाठी बँगलोर हायवेचा वापर करायचा आणि बाणेर परिसरात सातत्याने फिरत असायचा, ही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
### बाणेरमध्ये अहोरात्र सापळा अन् फिल्मी स्टाईल पाठलाग
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बाणेर भागात दोन ते तीन दिवस अहोरात्र सापळा रचला. दिनांक ०७ जून २०२६ रोजी रात्री २०:३० वाजता आरोपी सुमित इंगळे पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशाने बाणेर भागात आला. मात्र, तिथे पोलिसांची हालचाल पाहून त्याला संशय आला आणि तो आपल्या स्पोर्ट बाईकवरून वेगाने पळून जाऊ लागला. यावेळी पोलीस पथकाने कोणताही विचार न करता फिल्मी स्टाईलने त्याचा थरारक पाठलाग केला आणि त्याला बेड्या ठोकल्या.
### तपासात ५ मोठे गुन्हे उघड; आरोपीचा मोठा गुन्हेगारी इतिहास
पोलिस कोठडी दरम्यान आरोपीची कसून चौकशी केली असता, त्याने एकट्यानेच हे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून एकूण ७६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून खालील ५ पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत:
१) **सांगवी पोलीस ठाणे** (गु.र.नं. २३७/२०२६)
२) **दापोडी पोलीस ठाणे** (गु.र.नं. ४९/२०२६)
३) **तळेगाव पोलीस ठाणे** (गु.र.नं. १७०/२०२६)
४) **देहूरोड पोलीस ठाणे** (गु.र.नं. १३७/२०२६)
५) **भारती विद्यापीठ पोलीस ठाणे** (गु.र.नं. ३२१/२०२६)
पकडलेला आरोपी सुमित इंगळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०१६ आणि २०२४ सालात हिंजवडी, सांगवी, शिरवळ आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरी (कलम ३९२) आणि फसवणुकीचे (कलम ४२०) अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत.
> **मार्गदर्शक व कारवाई करणारे पथक:**
> सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सपोनि दत्तात्रय गुळीग, पोउनि कर्मराज गावडे, शिवानंद स्वामी, सपोउपनि प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, मपोहवा उषा दळे आणि अंमलदार महादेव जावळे, देवा राऊत, शिवराम भोपे, अजय डगळे, सागर अवसरे, मारुती करचुंडे, विजय शेळकंदे, संदेश देशमुख, विजय जानराव, तेजस भालचिम, सोहेल चिखलकर व केशव चेपटे यांच्या पथकाने केली आहे.
न्यूज एक्सप्रेस १८ विशेष वृत्त.**
*वेगाने… अचूक… तुमच्यापर्यंत! ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज एक्सप्रेस १८.*
