जालना (प्रतिनिधी) :- जालना शहरात ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवून दहशत पसरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला जालना पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATU) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी एक तलवार जप्त केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तेघबीर सिंह संधू व अपर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे आणि त्यांचे पथक माहिती घेत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली.
शिवाजी पुतळा परिसरातील पोस्ट ऑफिसमध्ये एका तरुणाने ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवली असून, तो ती घेऊन जात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सिद्धेश्वर एकनाथ राठोड (वय २४ वर्ष, रा. म्हाडा कॉलनी, भोकरदन नाका, जालना) याला ताब्यात घेतले.
कायदेशीर कारवाई:
पोलिसांनी आरोपीकडून ३५०० रुपये किमतीची एक तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी केली कारवाई:
सदरची धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन इंगळे, सपोउपनि शिवरकर, पोहेकॉ गडधे, पोहेकॉ सोनवणे व दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज एक्सप्रेस १८,
**Facebook | Twitter | Pinterest | LinkedIn**
