प्रतिनिधी :- प्रमेश्वर कांबळे
**पुणे:**शासकीय जमिनीचे वाटप आणि हस्तांतरण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन झाल्याचा तसेच खोट्या जात प्रमाणपत्राचा आधार घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मारुती गणपत जाधव यांनी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी करणारा तक्रार अर्ज सादर केला आहे.
**नेमके प्रकरण काय?**
मयत वीरप्पा उर्फ बिराप्पा अंबाजी गायकवाड यांना ११ जुलै १९८९ रोजी शासनाने विमुक्त भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गांतर्गत वराह पालनासाठी शासकीय जमीन मंजूर केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर १२ सप्टेंबर १९९५ रोजी या जमिनीवर त्यांच्या वारसांची नोंद करण्यात आली. मात्र, ही वारस नोंद करताना मूळ अटी व शर्तींचे पालन केले गेले का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
**खोट्या जात प्रमाणपत्राचा आरोप**
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, अंबादास बिराप्पा गायकवाड हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील ‘येनकी’ गावचे रहिवासी असून ते ‘कैकाडी’ (VJNT) प्रवर्गात मोडतात. तरीही, त्यांनी बुलढाणा येथून अनुसूचित जातीचे (SC) खोटे जात प्रमाणपत्र मिळविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच खोट्या प्रमाणपत्राचा वापर करून कुंदन अंबादास गायकवाड याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवून नगरसेवकपद मिळविल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
**प्रमुख मागण्या:**
* शासकीय जमिनीच्या हस्तांतरण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
* संबंधित व्यक्तींच्या जात प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यात येऊन ती रद्द करण्यात यावी.
* शासकीय अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
* या फसवणुकीमुळे शासनाचे झालेले आर्थिक नुकसान संबंधित व्यक्तींकडून वसूल करण्यात यावे.
या धक्कादायक प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
