सुखापूरी–कुक्कडगांव येथे भव्य ‘शंकर पट’बैलगाडा शर्यतींचा थरार; १ लाख ७० हजारांच्या बक्षिसांची लूट*
अंबड (प्रतिनिधी)

अंबड : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्साहात अंबड तालुक्यातील सुखापूरी–कुक्कडगांव परिसर पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतींच्या थराराने दणाणून जाणार आहे. ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘शंकर पट’ बैलगाडा शर्यती सोमवार दि.९ मार्च २०२६ व मंगळवार दि.१० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून कुक्कडगांव येथील गायराण गट क्रमांक २७ मैदानावर रंगणार आहेत.
या शर्यतीसाठी आयोजक समितीने तब्बल १ लाख ७० हजार रुपयांच्या आकर्षक बक्षिसांची घोषणा केली असून बैलगाडा मालकांसाठी ही अक्षरशःबक्षिसांची मोठी लूट ठरणार आहे.त्यामुळे अंबड तालुक्यासह परिसरातील बैलगाडा शौकिनांमध्ये या स्पर्धेबाबत प्रचंड उत्साह आणि उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या भव्य ‘शंकर पट’ शर्यतीचे आयोजन अशोक बोटे,उद्धव गायकवाड,प्रताप राखुंडे,राजेंद्र गायकवाड आणि राजेंद्र मोताळे यांच्या पंचकमिटीच्या पुढाकाराने करण्यात आले असून गावकऱ्यांच्या सहकार्याने या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे.
शर्यतीचा थरार अधिक रंगतदार करण्यासाठी प्रकाश पटेकर सर,बाबा लंगोटे (मास्तर), लक्ष्मण शिंदे आणि राजेंद्र लहुटे यांच्या दमदार आणि जोशपूर्ण आवाजात कॉमेंटरी होणार आहे.त्यामुळे मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना प्रत्येक क्षणाचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आसाराम चौरे, दिपक पटेकर,बालाजी गायकवाड, योगेश गायकवाड, गजानन शिंदे,कल्याण शिंदे,परमेश्वर शिंदे,सतिश राखुंडे,वसंतराव जाधव,अमोल भाकड,चक्रधर जाधव,सचिन लहामगे,भागवत राखुंडे,बालु लहुटे,लहु ढवळे,दत्ता शिंदे,लक्ष्मण राखुंडे,मच्छिंद्र राखुंडे,अर्जुन जाधव,आबा चांगले,रमेश गायकवाड,सुनील मुंजाबा पटेकर,रामेश्वर गायकवाड,रूद्धा गायकवाड, संजय गायकवाड,बालासाहेब गायकवाड आदी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या शर्यतीत धावणाऱ्या बैलजोडींचा अचूक शकंद (वेळ) मोजण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गणेश पळसकर यांचे डिजिटल घड्याळ वापरण्यात येणार असून त्यामुळे स्पर्धा अधिक पारदर्शक आणि रोमांचक होणार आहे.
दरम्यान,स्पर्धेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असून जनावरांची सुरक्षितता राखण्याची व कोणतीही जीवितहानी टाळण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मालकाची राहील.तसेच पंचांचा निर्णय अंतिम राहील,असे आयोजक समितीने स्पष्ट केले आहे.
दरम्यान,या भव्य बैलगाडा शर्यतींचा थरार अनुभवण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ व बैलगाडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



